Sunday 7 October 2012

मित्रांनो,

अमेरिकेत रिकामपणी एक लेख लिहिला आहे. आवडला तर बघा. मला जरूर सांगा.

ड्रायव्हिंग इन अमेरिका

अमेरिकेमध्ये पाहूणा म्हणून आल्यावर इथे गाडी चालवणं म्हणजे धाडसाचंच काम असं वाटायला लागतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे गाडीत ड्रायव्हर डाव्या बाजुला आणि गाडी चालवायची रस्त्याच्या उजव्या बाजूने. आपल्या अगदी उलट. प्रचंड घोटाळा उडतो. कित्येक वेळा ड्रायव्हरच्या शेजारी म्हणून आपण डाव्या बाजूने दार उघडायला जातो आणि आपला मोरु बनतो. अर्थात हे सुरुवाती सुरूवातीलाच. पण एकादा का त्याची संवय झाली की मग आपण रुळतो. आणि इंटरनॅशनल लायसेन्सच्या जोरावर गाडी चालवायला लागलो की हळूहळू त्यातल्या खुब्यांची आणखी माहिती व्हायला लागते. रस्त्यावर सतत सूचनांच्या, डायरेक्शन्सच्या पाट्या असतात त्यांच्याकडे चतुरस्त्रपणे लक्ष ठेवायला लागतं. आखून दिलेल्या लेन्सचं, ट्रॅफीक लाईट्सचं भान ठेवायला लागतं. क्रॉसिंगवर, डावीकडे वळताना लगेच न वळता रस्त्याच्या पलीकडून वळायचं, आणि उजवीकडे वळताना लगेचच वळायचं, हे प्रयत्नपूर्वक लक्षात ठेवायला लागतं. पुढची गाडी आणि आपली गाडी यातलं सुरक्षित अंतर ठेवायची काळजी घ्यायला लागते. मग इथे ड्रायव्हिंगची मजा वाटायला लागते. अर्थात काही काही घोटाळे होतातच. आपण सिग्नल दाखवायला जातो आणि शिंचे वायपरच चालू होतात! कारण स्टीअरिंग व्हील उजवीकडून डावीकडे नेताना सिग्नल आणि वायपरच्या लिव्हर्स मात्र उलट्या बाजूला केलेल्या असतात. आपल्याला सतत हात बाहेर काढून सिग्नल द्यायची संवय, पण इथे मात्र तसं केलं तर बाकिच्यांचा गोंधळच. आपण ड्रायव्हिंग करताना दुसर्‍या ड्रायव्हर्स कडे क्रुद्ध नजरेनं पाहत असतो तर इथे मात्र, 'पहिले आप पहिले आप'! पादचार्‌यांच्या बाबतीत तर सौजन्याची कमाल. आंखून दिलेल्या पट्ट्यांमधून तुम्ही क्रॉस करणार असल्याचा संशय जरी आला तरी गाडी ठप्प. तुम्ही गेल्यावरच ती पुढे. मुलांच्या बाबतीत तर सर्वोच्च काळजी. मुले चढण्या उतरण्या साठी स्कूल बस थांबलेली असताना तिला ओलांडून पुढे जाणं म्हणजे महत्पाप! रस्त्याच्या पलीकडे सुद्धा वहनांनी थांबलच पाहीजे. गंमतच आहे. एरव्ही मुलांच्या मानसिकतेची पर्वा (सामाजिक रुढींच्या दृष्टीनं) न करणारी ही मंडळी या बाबतीत मात्र अति दक्ष! काहीकारणाने जर बसला उशीर होणार असेल तर ट्रॅफिक डिपार्ट्मेंट कडून तसा घरी फोन येतो.

रस्ते हे अमेरिकेचं वैशिष्ठ्य आहे. किंबहुना त्यांचा मानबिंदूच आहे तो. त्यांची प्रगती होण्याला रस्त्यांचं जाळंच कारणीभूत आहे. आपल्याला एखाद्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे चं अप्रूप वाटतं. पण इथे सर्वत्र त्याचंच दर्शन! मैलोन् मैल वहाणारे. एकेका बाजूला सहा सहा लेन्स असलेले. समोरच्या चढावर डौलदार वळण घेणारा तो रूबाबदार रस्ता नुसता पहाणं म्हणजे नेत्रसूखच. एकदा मुख्य रस्त्यावर आलं की वेग मर्यादा 50 ते 60 मैलांच्या पुढेच. सुरूवातीला छातीत धडकीच भरते. पण सर्वच वहातूक अत्यंत शिस्तीत असल्याने कुठेच प्रॉब्लेम येत नाही. मात्र वहानांची संख्या प्रचंड असल्याने ठरावीक ठिकाणी ट्रॅफीक जॅम्सना सामोरं जावं लागतं. तरीही लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून, मुख्यत: सकाळच्या वेळी, टी.व्ही. वरून कुठच्या रस्त्यावर गर्दी आहे आणि कुठचा मोकळा आहे याची सतत माहिती दिली जात असते. रस्त्यावरील वहानांची संख्या कमी असावी म्हणून अनेक प्रयोग केले जातात. शक्य असेल तिथे लोकांनी 'कार पूल' करावा म्हणून प्रोत्साहन दिलं जातं. ज्या वहाना मध्ये तीन पेक्षा जास्त प्रवासी असतील त्यांना स्पेशल लेन असते. अर्थात इथल्या लोकांच्या मानसिकते मुळे ही स्पेशल लेन जवळपास रिकामीच असते आणि शेजारच्या लेन्स मध्ये मागेपर्यंत रांगा लागलेल्या असतात.
सगळ्या हायवेज वर पुढचा बाहेर पडणारा रस्ता (एक्झिट) किती अंतरावर आहे याच्या स्पष्ट सूचना दिलेल्याअसतात. सर्व्हीस एरिया, म्हणजे 'विश्रांतीची जागा' ठिकठिकाणी असते. पुढची जागा आता यानंतर किती मैलांवर आहे हे ही सांगीतलेलं असतं. त्यामुळे कितीही लांबचा प्रवास असला तरी सुखावह! हो, इथे आगगाडी मधून किंवा विमानातुन जाणं तसं परवडण्या सारखं नसल्यामुळे आम जनता लांब जायचं असलं तरी रस्त्यानंच जाणं पसंत करते. त्यातून आता बरोबर जी. पी. एस. असल्याने रस्ता चुकायाचा वगैरे प्रश्नच नाही. गाड्यां मधल्या सुखसोयी अत्याधुनिक असल्यानं ड्रायव्हिंगचं टेन्शन नाही. गाडीत चुकून किल्ली ठेऊन खाली उतरायला लागलो की गाडीचा आरडा ओरडा सुरू. गाडी रिव्हर्स करताना मागे कोणी आलं तर गाडी थांबलीच. इंटलिजंट गाडी म्हणे! अर्थात हल्ली आपल्या कडेही अशा गाड्या दिसतात. एक गंमत म्हणजे काही वर्षां पूर्वी, भावाकडे फ्ल्युईड ड्राईव्ह्ची नवी कोरी टोयोटा गाडी पाहील्यावर, 'म्हणजे ही तर आपल्या कडच्या ल्युना सारखीच, गीअर वगैरे बदलायची भानगड नाही' असं मी म्हटल्यावर माझ्या वहीनीनं माझ्यावर जी जळजळीत नजर टाकली होती ती अजून विसरलो नाही. असो. तर रस्ते आणि त्यावरचा प्रवास ही अमेरिकन लोकांची जीवन पद्धतीच आहे. ज्या कंपन्यांमध्ये मार्केटिंगच्या लोकांना सतत प्रवासाची गरज असते त्यांना वेळोवेळी ड्रायव्हिंगचे रिफ्रेशर्स कोर्सेस असतात. दुसर्यानं कितीही चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवली तरी तुम्ही संयम सोडू नका, हे त्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी.

हे सर्व सुरक्षीत रहाण्यासाठी रहदारीचे नियम अतिशय कडक आहेत. ट्रॅफिक लाईट्स्चा मान प्रत्येकाने राखलाच पाहीजे. जर एखाद्याने लाल लाईटवर क्रॉस केलंच तर समोरच्या खांबावरील कॅमेर्‌या मध्ये त्याचा फोटो आणि लगेच नोटीस. त्यातल्या दंडा शिवाय भीतीदायक म्हणजे लायसेन्सवर शेरा. आणि त्याचा परिणाम म्हणजे इंन्शुअरन्सच्या हप्त्यामध्ये वाढ. जास्तवेळा शेरे मिळाले तर लायसेन्स रद्द. नकोरे बाबा ती भानगड! ट्रॅफिक लाईट्स् शिवाय, जिथे दोन रस्त्यांचं क्रॉसिंग असेल तिथे कमी रहदारीच्या रस्त्याच्या कोपर-यावर स्टॉप
साईन. रात्रीचे बारा वाजले असतील, सगळीकडे शुकशुकाट असला तरी तिथे गाडी पूर्णपणे थांबवून दुसर्‍या बाजूने कुठलही वहान येत नाही याची खतरजमा केल्यावरच पुढे जायचं. हे न करणं म्हणजे साक्षात मृत्युला आमंत्रण. कारण ज्याला स्टॉप साईन नाही तो बिनदिक्कत पूर्ण वेगात येणार. ज्या क्रॉसिंगला दोन्ही रस्त्यांवर सारखी रहदारी असेल तिथे चारी कोपर्‌यांवर स्टॉप साईन. सर्वांनी पूर्ण थांबून आळीपाळीनं जायचं. हे अगदी अमेरिकाभर छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा. त्यामुळे कुणाच्याच मनात गोंधळ नाही. हे सर्व अंगी बाळ्गून एखादेवेळी अपघात झालाच तर वॅं वॅं करत पोलीसांच्या गाड्या आणि अॅंब्युलन्सेस लगेच हजर. त्यांच्या हालचालींना अडथळा नको म्हणून अगदी हायवे वर सुद्धा सदैव मोकळ्या सर्व्हीस लेन्स! खरंच अभिमान वाटवा अशी शिस्त आणि व्यवस्था.

गाडी चालवायला एकूण मजा येते. आणि एखादी रपेट मारून आल्यावर शेजारी जीव मुठीत पकडून बसलेली बायको जेंव्हा कौतुकाचा कटाक्ष टाकते त्या क्षणी तरी मी 'जगी सर्व सुखी'!

सुरेश नातू.