Wednesday 21 September 2016

हवाई गंमती जमती



काही हवाई गमती जमती
अर्थातच, विमान प्रवासातल्या. या प्रवासांमध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या सेलिब्रिटीज त्याच विमानात असण्याचे योग आले. एकदा, त्या काळचे, संरक्षण मंत्री बाबू जगजीवनराम माझ्या पुढच्याच सीटवर बसले होते. (त्या काळी ‘झेड् प्लस’ सिक्युरिटी वगैरे खुळं सुरु झाली नव्हती). तर एकदा राष्ट्रपति शंकर दयाळ शर्मा यांच्या पत्नीच माझ्या शेजारच्या सीटवर होत्या. त्यांनी अगत्यपूर्ण केलेल्या चौकशीनं मी भारावून गेलो होतो. एकदा पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या बरोबर असाच शेजारी बसून प्रवास करण्याचा योग आला होता. त्यांच्या बरोबर बोलल्याने माझं भाग्यच उजळलं!  सिने नटनट्या तर अनेक वेळा सहप्रवासी असायचे. आम्ही मात्र उगीचच ‘आज आमच्या बरोबर शबाना किंवा रेखा होती’ वगैरे बोलून भाव खायचो. त्यावेळी विमान सुटायला उशीर होण हे नित्य नेमाचं असायचं. असंच एकदा मुंबई-त्रिवेंद्रम फ्लाईट निघायला खूप उशीर झाला होता. कंटाळा आला म्हणून मी जरा इकडे तिकडे हिंडत होतो. तर चक्क साक्षात राजेश खन्ना त्याच्या चमच्यांबरोबर फिल्मी स्टाईल मध्ये टाईमपास करत बसलेला दिसला. त्या काळात त्याची हवा बरीच जोरात होती. कुठच्या तरी पिक्चरसाठी त्याने नेहेमीची झुल्फे कापून, केसांचा क्रॉप केला होता. अनेक उत्साही लोक त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी धडपडत होते. अर्थात मला त्यात काही विशेष इंटरेस्ट नव्हता. मी आपला त्या बाजूने एक चक्कर टाकून परत येऊन वाचत बसलो. खूप उशीर करून एकदाची ती फ्लाईट निघाली. माझी सीट खिडकी जवळची होती. शेजारी एक सीट, पलीकडे आयल, आणि त्याच्या पलिकडे पुन्हा तीन सीट्स. नेमका आयलच्या पलीकडच्या सीट वर राजेश खन्ना आणि नंतर त्याची चमचे मंडळी. विमान सुटायच्या आधी माझ्या शेजाराच्ग्या सीटवर एक टिपिकल दुबईहून परत आलेला मल्याळी येऊन बसला. लुंगी, त्यावर सिल्कचा शर्ट, गळ्यात सोन्याची जड जूड  चेन, दोन-चार अंगठ्या, हातात भला मोठा थ्री इन वन, इ.इ. विमान हवेत उडाल्यावर त्यानं वरच्या खिशातून 555 चं पाकीट काढलं आणि माझ्या कडे वळून मला एक सिगारेट आॉफर केली (त्यावेळी स्मोकिंग प्रोहिबिटेड नव्हत). मी सिगारेट ओढत नसल्याने मी नकार दिला. त्याने सिगारेट काढून ओठात धरली आणि लायटर शोधायला लागला. तो सापडेना. मिळत नाही म्हटल्यावर तो इकडे तिकडे बघायला लागला आणि त्याची नजर नेमकी राजेश खन्नाच्या समोर टेबलावर ठेवलेल्या गोल्ड प्लेटेड लायटर वर गेली. तो वाकून वाकून तो लायटर उचलायला गेला. राजेश खन्नानं ते पाहिल्यावर त्यान तो लायटर झडप घालून उचलला आणि स्वत:च त्या मल्ल्याळ्याची सिगारेट पेटवून दिली. मला हे सर्व पाहताना थोडी गम्मतच वाटत होती. पाच मिनिटं गेल्यावर मी माझ्या शेजार्याशी जरा संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागलो. त्याची भाषेची बोंबच होती पण थोडं मोडक तोडक संभाषण होत होत. त्याला विचारलं हिंदी सिनेमा बघतोस की नाही? त्यानं मान डोलावल्यावर मी विचारलं तुझी सिगारेट आत्ता कोणी पेटवून दिली ते माहिती आहे का? तो राजेश खन्ना आहे. येव्हढं  ऐकल्यावर त्यानं उडी मारून राजेश खन्नाकडे तोंड केलं ते पुढचे तास दीड तास तो तसाच एकटक बघत बसला. माझी खात्री आहे की म्हातारा होईपर्यंत तो मुला नातवंडांना ‘राजेश खन्नानं माझी सिगारेट कशी पेटवून दिली’ त्याची कहाणी सांगत असणार!
पावसाळ्याच्या दिवसात दिल्लीवरून विमान सुटायला हमखास विलंब असायचा. चहूकडे धुकं लपेटलेल असायचं. तासन् तास प्रतीक्षा करून जीव कंटाळून जायचा. पुन्हा, अवेळी मुंबईला पोहोचल्यावर, परत पुढचा पुण्याचा प्रवास करायचं दिव्य डोळ्यांसमोर नाचत असायचं. अशाच एका पावसाळी रात्री ११ च्या सुमारास आमच विमान दिल्लीहून निघालं. मोठं बोईंग विमान होत पण विमानात आम्ही अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच प्रवासी होतो. जवळपास ८०% सीट्स रिकाम्याच होत्या. विमान उडाल्यावर लगेचच जेवण आलं. अतिशय दमलेलो असल्यानं जेवण झाल्या झाल्या मी पायातले बूट काढले आणि बाजूच्या सीट्सचे आर्मरेस्ट वरती करून झक्कपैकी ताणून दिली. पाऊणएक तासांनी मला धक्क्यांनी जाग आली. पाहतो तर काय एअर पॉकेटस् मुळे विमान पुन्हपुन्हा जोरदार खाली येत होतं. माझी खात्रीच झाली की आता विमान नक्कीच कोसळणार. त्या क्षणी, आता आठवलं तरी हसूं येतं, माझी प्रथम प्रतिक्रिया काय झाली असेल? मी उठलो आणि पहिल्यांदा पायात बूट घातले! सुदैवानं काही विपरीत घडल नाही आणि आम्ही मुंबईला सुखरूप पोहोचलो. असाच एक अनुभव भूजहून अहमदाबादला येताना. यावेळी आकाश निरभ्र होत पण विमानाचे हेलकावे तसेच. यावरून एक आठवण आली. दुर्दैवाने एकदा पुणे-मुंबई अॅव्हरो विमान तळोद्या जवळच्या डोंगरात कोसळून सर्व प्रवाश्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कितीतरी काळ सर्वांनीच त्या प्रवासाचा धसकाच घेतला होता. काही दिवसांनी मला मुंबईहून पुण्याला यायचं होत. हे विमान सुद्धा अॅव्हरोच होत. विमानात बसल्यावर कितीतरी वेळ त्या विमानाचे पंखे चालूच होईनात. ठराविक वेग घेऊन परत हळू होत होते. या पद्धतीच्या विमानात पायलट बसण्याची जागा आणि प्रवासी यांच्या मध्ये फक्त पडदा असतो. त्यामुळे पायलटच्या केबिन मधलं सर्व संभाषण बाहेर ऐकू येत. तर तो पायलट कोणाशी तरी बोलून इंजिनिअरची मदत मागत होता. परत पंखे थांबले आणि दोघे तिघे जण विमानच दार उघडून आत आले आणि केबिनमध्ये गेले. पुन्हा अधीच्याच प्रकारची पुनरावृत्ती चालू झाली आणि नंतर चढ्या आवाजातली बोलणी ऐकू यायला लागली. पण पंखे एकदाचे पूर्ण वेगान चालू झाले. सार्वजण सुटकेचा निश्वास टाकता आहेत तेव्हढ्यात आतल्या भांडणाचे शेवटचे शब्द ऐकू आले.    I have shown you the trick, now you can fly’. हे ऐकल्या बरोबर विमानातले अर्धे लोक खाली उतरले. ‘We can’t take risk of flying with tricks’. सगळं प्रकरण एअरपोर्ट मॅनेजर कडे गेल्यावर मग त्यानं दुसरं विमान सोडण्याच कबुल केल्यावर कुठे सर्वांची शांती झाली. यांच्या हलगर्जीपणामृळे आपले जीव धोक्यात!
माझ्या पहिल्या वहिल्या विमान प्रवासाचा अनुभव मात्र अगदी चटका लावणारा आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात एका छोट्या विमानातून आग्र्याहून सुटका करून घेत अहमदाबादला निघालो होता. प्रथमच विमानात बसलो असल्यान खूपच एक्साइटेड होतो. सर्व गोष्टी बारकाईनं निरखीत होतो. विमान उडाल्यावर तर बघायलाच नको. सतत खिडकीच्या बाहेर लक्ष! तेव्हढ्यात ती हवाई सुंदरी चहा घेऊन आली, चक्क मला सर म्हणत. लाजलोच थोडा मी! मग आम्ही शाही रुबाबात मागे रेलून चाह्चा कप हातात धरून तोंडाकडे न्यायला आणि विमानानं डुबकी मारायला एकच गांठ! मग काय उजवा हात निघाला प्रवासाला. डाव्या हाताला सुद्धा तो सापडेना. पुढची कथा सांगायला हवी का? पण विमानातला चहा चांगलाच गरम असतो हे वाईट रितीन कळलं.   

एक चांगला अनुभवही सांगतो. त्या दिवशी विमानात अगदीच कमी गर्दी होती. मी अगदी शेवटच्या सीटवर जाऊन बसलो. विमान उडाल्यावर एअर होस्टेस  खाण्याचा ट्रे घेऊन आली. माझा नेमका संकष्टीचा उपास असल्याने मी तिला नकार दिला आणि हातातलं पु.लं.च पुस्तक वाचण्यात गढून गेलो. थोड्या वेळानं पर्सर माझ्या इथे आला आणि विचारलं ‘any problem sir?’ मी त्याला उत्तर दिल की प्रॉब्लेम वगैरे काही नाही. माझा आज उपास आहे. तुमच्या कडे काही फ्रुट्स किंवा आईसक्रिम असेल तर मला चालेल. ते ऐकून तो परत गेला. थोड्या वेळाने ती एअर होस्टेस मान डोलवत आली.’ सॉरी. आज आमच्या कडे फक्त केक आहे’. मी नकार दिला आणि पुस्तकात डोकं खुपसलं. थोड्या वेळाने परत ती एअर होस्टेस समोर हजर. मी जरा त्रासिकपणेच तिच्या कडे पाहिलं. आता काय? ती म्हणाली ‘सर पर्सर तुम्हाला बोलावतो आहे’. मी उठून तिच्या बरोबर तिथल्या पॅन्ट्रीमध्ये गेलो. तर तो पर्सर हंसतमुखाने मला म्हणतो ‘सर तुमचा उपवास आहे ना? मग तुम्हाला साबुदाण्याची खिचडी चालेल का?’ मी अवाक्! ३०,००० फुट उंचीवर खिचडी? माझा विश्वासच बसेना? म्हटलं अर्थातच चालेल, पण कशी मिळणार? यावर त्यान उत्तर दिलं ‘आमच्या एका एअर होस्टेसचा सुद्धा उपास आहे तिने खिचडी आणली आहे ती तुम्ही शेअर करा. काय म्हणणार? अत्यानंद! गप्पा मारत असताना ती मुलगी म्हणाली ‘मी ख्रिश्चन आहे पण माझा नवरा हिंदू आहे म्हणून मी उपास करते’. क्या बात है. हा योगा योग. मझा आया! आहे की नाही गंमतिदार अनुभव? मी पुण्याला परत आल्यावर इंडियन एअरलाइन्सला सर्वांच्या नावानिशी वार आभाराचं पत्र पाठवलं. त्यात सब्जेक्ट लिहिला होता ‘३०,००० फुट उंचीवरचे अगत्य’.
असो. इत्यलम्.
सुरेश नातू.






Wednesday 23 March 2016

इजिप्त मधली सुरस आणि चमत्कारिक कथा



इजिप्त मधली सुरस आणि चमत्कारिक कथा

चांगलं जीवन सुरळीत चालू असतं आणि कधीतरी असं काहीतरी घडतं आणि अनपेक्षित प्रसंग समोर उभा ठाकतो, की आपण कशाला उगीचच सुखातला जीव दु:खात घातला असं वाटायची वेळ येते. १९८३ साली सुजाताला (माझी पत्नी) इस्राईल मधून एका सेमिनार आणि नृत्य समारोहात भाग घेण्याचं निमंत्रण आलं. त्या काळी भारताचे आणि इस्राईलचे राजनैतिक संबंध नव्हते. कुणाचा तरी सल्ला घ्यावा म्हणून, थोडी फार ओळख काढून, आम्ही त्यावेळचे माहिती आणि प्रसारण मंत्री बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या कडे गेलो. त्यांनी तर स्पष्ट सांगितलं की तिथली युद्ध परिस्थती तुम्हाला माहितीच आहे, आपले त्या देशाशी राजकीय संबंध नाहीत. या बाबतीत जे काही करायचं असेल ते तुम्ही फक्त तुमच्या जबाबदारीवर करा. सरकारतर्फे, तुम्ही अगदी अडचणीत आलात तरीही, काहीही मदत मिळू शकणार नाही. त्याचं येव्हढं लेक्चर ऐकल्यावर आम्ही नर्व्हस होऊनच परत आलो. पण सुजातानं अगदी हट्टच धरल्यावर आम्ही परत  त्याचा विचार करायला लागलो. काही डॉक्टर मंडळी तिथे जाऊन आली होती त्यांचे अनुभव विचारल्यावर त्यांनी सल्ला दिला की अगदी बेशक जा. तिथली मंडळी अतिशय अगत्यशील आणि मदतीला सदैव तत्पर असतात. मुख्य म्हणजे तिथे तुमच्या भोवती मराठी मंडळींचा गराडाच पडेल. हे ऐकल्यावर आम्हाला थोडा धीर आला. आणि आम्ही पुढे जायचा निर्णय घेतला. आमचा ग्रुप म्हणजे सुजाता बरोबर आणखी दोन मुली, एक मदतनीस आणि अर्थातच मी. आता जायचं म्हटल्यावर 'संन्याशाच्या लग्नाला' म्हणतात तसं, सर्व धावपळीला सुरुवात. मुलींचे पासपोर्टस् नव्हते ते काढण्या पासून सुरुवात. सुदैवाने विशेष काही त्रास न होता ते सोपस्कार पार पडले. या नंतर व्हिसासाठी धावपळ. कॉन्स्युलेट नव्हतच पण त्यांची वाणिज्य कचेरी मुंबईला पेडर रोड वर होती. तिथे मी आणि सुजाता गेलो. कडक सुरक्षा व्यवस्थेतून स्टेनगनच्या पहाऱ्यात (ज्याची नंतरच्या प्रवासात आम्हाला सवयच झाली) आम्हाला आत मध्ये नेलं आणि सर्व छाननी केल्यावर, पासपोर्टवर शिक्का न मारता एका कागदावर आम्हाला सहा आठवड्यांचा विसा दिला. तिथल्या कार्यक्रमाचं आमंत्रण सुजाताला आलेलं असल्याने व्हिसाचं पत्र तिच्या नावावर होत. आता प्रवासाची तयारी! इस्राईलला जायचं असल्याने कुठचाही ट्रॅव्हल एजंट मिळेना. शेवटी कुणाच्या तरी ओळखीनं भायखळ्याच्या एका एजंटाचा पत्ता मिळाला. त्या बकाल वस्तीतल्या तिसर्या मजल्यावर एका कुरकुरणाऱ्या डगमगत्या जिन्यावरून जाताना छातीत धडधडतच होत, आणि एका छोट्या खोलीवजा ऑफिसमध्ये बसलेल्या माणसाच्या हातात पाच जणांच्या तिकिटाचे पैसे ठेवताना ब्रह्मांड आठवलं होत. पण झालं! आमचं बुकिंग टीडब्ल्यूए कंपनी तर्फे मुंबई ते कैरो आणि पुढे इजिप्त एअरच्या फ्लाईटने कैरो ते तेल आव्हीव असं झालं. ठरल्या दिवशींच्या आदल्या दिवशीच मी आणि मुली मुंबईला गेलो कारण फॉरीन एक्स्चेंज घ्यायचं होत. (त्यावेळी ही गोष्ट आता सारखी सोपी सरळ नव्हती). सुजाता दुसर्या दिवशी पुण्याहून प्रचंड पावसात सगळं समान घेऊन आली. तिला एका भयानक प्रसंगातून जायला लागलं होत आणि ती केवळ दैवी शक्तीच्या मदतीतूनच त्यातून बाहेर पडली होती. लेकीन वो कहानी फिर सही. तर टीडब्ल्यूएच्या, शनिवारी रात्रीच्या, फ्लाईटने आम्ही पाच जणांनी कैरोकडे उड्डाण केलं. विमान निघायला दोन एक तास उशीरच झाला होता. कैरो जवळ आल्यावर मी एअर होस्टेसला विनंती केली की आमचं पुढच्या इजिप्त एअरच्या तेल आव्हीवला जाणार्या फ्लाईटचं कनेक्शन आहे आणि आता ही फ्लाईट पोहोचायला उशीर होतो आहे तरी त्यांना प्लीज आमच्यासाठी थांबायला सांगा. ती म्हणाली ठीक आहे, मी योग्य ती व्यवस्था करते. फक्त विमान उतरण्याच्या आधी तुम्ही पुढे येऊन बसा. मी विजयी मुद्रेनं जागेवर येऊन बसलो. विमान उतरण्याच्या आधी अर्धा तास तिने सांगितल्या प्रमाणे सर्व जण पुढे जाऊन बसलो. विमान उतरल्यावर आम्हाला स्पेशल शिडी लावून खाली उतरवण्यात आलं, आणि डिपार्चर गेट मधून आत जायला सांगितलं. त्या वेळी रविवार सकाळचे ७ वाजत होते. आत शिरताना गेट वरच दोघे सध्या कपड्यातले खरं म्हणजे जरा गुंडांसारखे दिसणारे दोघे जण वड्या सारख काहीतरी खात बसले होते. त्यांनी आमचे पासपोर्टस मागितले. ते दिल्यावर काहीही न बघता त्यांनी ते एक रबर बॅंड मध्ये गुंडाळले आणि मागच्या कपाटात उडवून फेकून दिले. मी बघतच राहीलो. त्यांची पावती द्या असं म्हटल्यावर 'What receipt. No recipt. you will get them back when you leave' असं अत्यंत उद्धटपणे उत्तर दिल. माझा पुढे काही संभाषण करण्याचा प्रयत्न सुद्धा व्यर्थ गेला (त्यांच्या जवळच बंदुका ठेवल्या होत्या न?). भाषेची अडचण होतीच. नाईलाजाने आम्ही त्या हॉल मध्ये जाऊन बसलो. तिथे तर प्रचंड संमिश्र गर्दी आणि कोलाहल माजला होता. अत्ताचा डिपार्चर हॉल डोळ्यासमोर आणु नका. तिथे फक्त काही बाकडी आणि बाकी सर्व मोकळी जागा होती. सगळीकडे हिप्पी टाईप गर्दी, अनोळखी परदेशी चेहेरे, अनाकलनीय भाषा. जीव उबून गेला, त्यातून भयंकर उकाडा. पुढे काय करायचं काही समजेना. मग मी आणि सुजाता इन्क्वायरी काउंटरवर गेलो. भाषेची अडचण होतीच पण महत्प्रयासाने तिथल्या मुलीला सांगितलं की बाई आम्ही मुंबईहून आलो आहोत आम्हाला इजिप्त एअरच्या विमानान तेल आव्हीवला जायचं आहे, उशीर झाल्या मुळे आम्ही रिक्वेस्ट पाठवली होती तरी तू त्यांच्यासाठी, आम्ही आलो असल्याची अनाउन्समेंट दे. तिनं तसं केल्यावर थोडया वेळान एक फाटका म्हणावा असा दोन दिवसांची दाढी वाढलेला माणूस तणतणतच आला आणि म्हणाला 'येस येस, आय नो यु हॅव कम फ्रॉम बॉम्बे, बट आय कान्ट होल्ड माय फ्लाईट फॉर यु' आणि आम्हाला काहीही बोलायची संधी न देता सरळ निघूनच गेला. आम्ही स्तंभीत. आता आजूबाजूचे लोक सुद्धा अमच्याकडे बघायला लागले होते. त्याच्याकडे दुर्लक्ष करुन पुन्हा नेटाने त्या मुलीला विनंती केली की तू आता टीडब्ल्यूएच्या एजंट साठी अनाउन्समेंट दे. त्यानंतर खरच एक युनिफॉर्म मधली 'सुंदर खाशी सुबक ठेंगणी' मुलगी ठुमकत आली. मी तिला तिकीट दाखवली आणि सांगितलं की बाई तुमच विमान उशिरा आल्या मुळे आमची पुढची फ्लाईट चुकली आहे तरी तू आता आमची तेलअव्हीवला जायची व्यवस्था कर. तिनं तिचा वॉकी टॉकी काढून कुणाशी तरी बातचीत केली आणि मान वेळावत मला म्हणाली 'हो मी तुमची मंगळवारी रात्रीच्या फ्लाईटने जाण्याची व्यवस्था करते'. मी तिला हात जोडून सांगितलं की बये आज रविवार आहे आणि आज रात्री काहीही करुन मला तेलअव्हीवला पोहोचलच पाहिजे. कुठचीही एअर लाईन चालेल. त्यावर ती बुचकळ्यात पडल्या सारखा चेहेरा करुन तिथून निघूनच गेली. आम्ही आपले जैसे थे! पडेल चेहेऱ्यानं मी परत एकदा टीडब्ल्यूएसाठी अनाउन्समेंट देण्याची विनंती केली. यावेळी एक गलेलठ्ठ बाई गलबता सारखी डुलत आली. तिच्या पुढे सर्व गीता वाचल्यावर ती म्हणाली ती तिकीट माझ्याकडे द्या आणि तुम्ही परत त्या डिपार्चर हॉल मध्ये जाऊन बसा. मान डोलावण्या खेरीज आमच्याकडे पर्यायच नव्हता. आम्ही दोघे पराभूत चेहेर्यानं मुलींच्या जवळ येऊन बसलो. त्या जवळ पास रडायलाच आल्या होत्या. आम्ही सुद्धा विषण्ण मनान एकमेकांकडे बघत बसलो. हातात पासपोर्टस नाहीत तिकीट नाहीत. काय करावं बरं? त्याही परिस्थतीत मला थोडस हसू आलं. हिनं चिडूनच मला विचारलं आता हसण्यासारख काय झालं? मी तिला म्हटलं 'मला आता बहुतेक पीरॅमिडसचे दगड वाहून न्यायला पकडून नेणार आणि तुम्ही सर्व जणी कुठच्या तरी जनानखान्यात रवाना होणार!' माझे डोळे त्या हॉलच्या दरवाजा कडे लागलेले होते. जरा कुठे काही निळ्या युनिफॉर्मची हालचाल झाली की माझ्या हृदयाचे ठोके वाढत. आणि शेवटी आली! ते बाई नावाचे गलबत डुलत डुलत आलं! हातातली तिकीट नाचवत आलं! 'मी तुमचं बुकिंग आज रात्रीच्या 'एल आल' च्या फ्लाईट वर केलं आहे. तो पर्यंत तुमची राहण्याची व्यवस्था या एअरपोर्ट वरच्या हॉटेल मध्ये आहे. संध्याकाळी तुम्हाला घेऊन जायला इथला माणूस येईल. मी आता चालले. आमच ऑफिस फक्त सकाळीच उघड असत. मी सुद्धा आता उद्या सकाळीच येणार' ती एका दमात म्हणाली. मला हर्षवायूच व्हायचा काय तो बाकी होता. मी तिला मिठीच मारली असती, पण ती फारच जाडी होती. माझे हात पुरले नसते! असो. आम्ही आमचं चंबूगबाळं उचलून हॉटेल कडे प्रस्थान केलं. दिवस आरामात रमत गमत काढला. कलिंगड आणि भात एव्हढंच असलेलं जेवण कसबस उरकलं. संध्यकाळी एअर लाईनचा माणूस घ्यायला आल्यावर म्हटलं चला पन्वती संपलेली दिसतीय! छान कपडे षगैरे करुन, त्याच्या बरोबर खाली गेलो. थोडया वेळाने एल आल चा माणूस आला. आमची तिकीट घेऊन त्याच्या ऑफिस मध्ये गेला. आम्ही परत प्रतीक्षेत! थोडया वेळाने तो आला आणि विचारायला लागला 'ही तिकीट एन्डॉर्स कोणी केली? आमची आणि टीडब्ल्यूएची अशी काही अॅरेंजमेंट नाही, याचे पैसे कोण देणार?' पाच जणांच्या तिकिटाचे पैसे? माझी बोबडीच वळली. टीडब्ल्यूएचं ऑफिस तर बंद होत. कुणाला विचारणार? मी त्याला आमची कर्मकथा ऐकवली आणि आमची असहाय्य स्थिती वर्णन करून सांगितली. तो म्हणाला 'सॉरी, मी काहीच करू शकणार नाही'. पण शेवटी बुडत्याला काडीचा आधार मिळतोच. मी त्याला म्हणालो की मला प्लीज तुझ्या मॅनेजर कडे घेऊन चाल. मी त्याच्याशी बोलतो. तर तो म्हणाला 'ही इमिग्रेशन एरिया आहे. आमचं ऑफिस याच्या बाहेर आहे. तिथे तुम्ही व्हिसा शिवाय जाऊ शकणार नाही'. यावर मी त्याला परत त्याच्या मॅनेजरशी आमच्या तर्फे बोलून बघण्याची विनंती केली. आम्हला तिथेच बसवून तो तिकीट घेऊन परत गेला. आम्हा सर्वांची स्थिती काय वर्णावी? गणपति अथर्वशीर्ष, रामरक्षा, जे आठवेल ते म्हणत देवाचा धावा सुरु केला. इतकी मनोभावे प्रार्थना केल्यावर तो दीनदयाळू देव कसा प्रसन्न होणार नाही? कुणाला तरी पाझर फुटला असावा, आणि आमची तिकीट ओके होऊन आमच्या हातात पडली. पासपोर्ट्सही परत मिळाले. सामान बॅगेज डम्पमध्ये जाऊन आणावं लागलं. थोडी कटकट झाली पण मिळालं. आता तरी सुरळीत प्रस्थान व्हावं. पण नाही. कहानीमे और एक ट्विस्ट! इमिग्रेशन चेकला गेलो. (त्यावेळी प्रत्येकाच्या सामानासकट सर्व कागद पत्रांची तपासणी कसून होत होती. कदाचित युद्धकाळा मुळे असेल). आम्ही अगदी लवकर गेल्याने गर्दी नव्हती. फक्त आम्हीच! तर त्या तपासणीला एक उंचापुरा, गोरा, देवीचे वण तोंडावर असणारा, एखाद्या अमेरिकन सिनेमातला हेर शोभावा असा माणूस आला. सुरुवाती पासूनच अगदी संशयित नजरेन पाहत त्यान आमचं सगळ सामान उलटपालट केलं. त्यात बरेच घुंगरू पाहून त्यान प्रश्नांचा भडीमारच केला. शेवटी काही आक्षेपार्ह न सापडल्याने त्याने आमच्या पासपोर्टसची तपासणी सुरु केली. व्हीसा मागीताल्यावर मी त्याला तो जपून ठेवलेला पिवळट रंगाचा कागद दिला. बारकाईने वाचत तो अधूनमधून माझ्याकडे बघत होता. का कोण जाणे मला काहीतरी घोटाळा आहे असं जाणवत होत. एवढासा एक कागद वाचायला तो इतका वेळ का लावतो आहे हेच कळेना. थोडया वेळान त्यान तो कागद फडफडवत मला सांगितलं हा व्हिसा इन्व्हॅलीड आहे. हा गेल्या वर्षीचा आहे. ही बघा तारीख. खरंच त्या तारखेच वर्ष १९८३ च्या ऐवजी १९८२ होत. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला. मनात म्हटल त्या पेडर रोड वरच्या माणसाने काय लिहिलं आहे मला काय माहित? मी आपला त्याने दिला तो कागद तसाच फाईल मध्ये टाकला होता. सर्वजण अपेक्षेने माझ्या कडे पाहत होते. मी काय, रडणार? अतिशय पडेल चेहेर्याने मी तो कागद परत घेतला आणि अविश्वासाने त्या तारखेकडे पाहत बसलो. काय करावं? कस सुचल ते काळात नाही. तो कागद अर्धी घडी घातलेला होता तो मी पूर्ण उघडला, आणि नीट वाचल्यावर माझ्या लक्षात सर्व प्रकार आला. व्हिसाच्या तारखेच वर्ष १९८३च होत. त्या मूर्ख माणसाने व्हिसाच्या तारखे ऐवजी सुजाताच्या पासपोर्टची तारीख वाचली होती. योगायोगाने ती तारीख बरोब्बर एका वर्षा पूर्वीची होती. मी मान डोलवत तो कागद त्याला परत दिला आणि चुक दाखवली. तो माझ्याकडे अविश्वासाने (का निराशेने) पाहत होता. शेवटी नाईलाजाने पेनने काहीतरी खरडून त्याने तो कागद मला परत दिला आणि चिडून चिडून बघत, निघण्याची खूण केली. आमच्या सकाळपासूनच्या प्रार्थना फळाला आल्या, सर्व देव पावले आणि आमच्यासकट त्या एल आलच्या विमानाने तेल अव्हीवकडे उड्डाण केलं. कैरोची भूमी सुटली आणि आम्ही एक निश्वास सोडला. विमान तेल अव्हीवला पोहोचलं आणि त्या मध्यरात्री सुद्धा  डॅनिएल अब्राहम 'भारतीयांचं इस्राइल मध्ये मन:पूर्वक स्वागत असो' असा खणखणीत मराठीत लिहिलेला फलक घेऊन उभा होता. आमचं नष्टचर्य संपलं होत.