Tuesday 16 May 2017



हा हन्त हन्त!

ब्रेबॉर्न स्टेडीयम वर रंगलेला एक अटीतटीचा सामना. दुबळ्या भारतीय संघा समोर हॉल, सोबर्स, स्मिथ, लॉईड यांसारख्या धुरंधरांचा भरणा असलेला जोरदार तगडा वेस्टइंडीजचा संघ! कधी नव्हत ती भारतीय संघाला पुसटशी संधी दिसत होती. पाहुण्यांचा दुसरा डाव सुरु झाला होता. त्यांना झटपट गुंडाळले असते तरच काहीतरी आशा होती. हंट आणि होल्ट हे सलामीचे फलंदाज मैदानात होते. उम्रीगर इत्यादींनी ओपनिंग बॉलिंगची औपचारीकता संपवल्यावर आपलं स्पिनर्सचं हुकमी अस्त्र बाहेर काढण्यात आलं होत. पण ते सलामी वीर त्यांना दाद लागू देत नव्हते. लंच ब्रेक जवळ यायला लागला होता. प्रेक्षकही निराश होऊन पाहत होते. त्या प्रेक्षकांमध्ये एक होते पु.ल.. वैतागून त्यांनी उद्गार काढले 'हा हंट हंट'! हंटच्या नावाचा तो चपखल उपयोग पाहून त्या रुक्ष वातावरणात सुद्धा आजूबाजूला जोरदार हशा पिकला. क्रिकेटर्सच्या नावाची अजून एक गंमत म्हणजे, पुण्यात व्हिजिटिंग इंग्लिश टीमचा महराष्ट्राशी सामना चालू होता. त्यांच्या एका फास्ट बॉलरचं नांव 'व्हाईट' होत, आणि आपला ओपनिंग बॅटसमन होता हेमंत गोरे. कॉमेंट्री करताना बाळ पंडित त्यांच्या खास शैलीत म्हणाले 'श्री. व्हाईट हे श्री. गोरे यांना गोलंदाजी करत आहेत'!
बाकी नावात काय आहे असं शेक्सपियर म्हणाला असला तरी नावांमध्ये विनोद निर्माण करायची शक्ती मात्र नक्कीच आहे. एका कंपनी मध्ये बाबू, अण्णा, आणि बबन असे तीन भाऊ होते. त्याचं आडनाव 'हगवणे' होत, त्यावरून त्यांची खूप चेष्टा होत असे. मॅनेजरने त्यांना बोलावून सांगितलं की अरे तुम्हाला तुमच नाव बदलता येईल. ते बदलण्यासाठी गॅझेटमध्ये कसा अर्ज करायचा, वर्तमानपत्रात कशी नोटीस द्यायची वगैरे नीट समजावून सांगितलं. महिन्याभराने ते तिघे साहेबांच्या केबिनमध्ये जाऊन सलाम करुन उभे राहिले आणि सांगितलं सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे आम्ही सर्व केलं. साहेब खुश! 'नवीन नाव काय ठेवलत' असं विचारल्यावर 'आता आमची नावं दत्ता हगवणे, शंकर हगवणे, रघु हगवणे' त्यांनी अभिमानाने सांगितलं! साहेबांनी कपाळाला हातच लावला.
आमच्या कंपनीत टाईम आॉफिसमध्ये असाच एक भोळसट दिसणारा क्लार्क होता. तो अमच्या इंजिनिअर्स केबिन मध्ये आला. तिथे आलेला माणूस आमच्या तावडीत सापडला की मग त्याची खैर नसे. कोणी तरी त्याला विचारलं 'What is your name?' I am smart. त्यान उत्तर दिल. 'Yes yes we know you are smart, but what's your real name'? आम्ही परत विचारलं. पण त्याचं उत्तर कायमच. ' I am smart.' मग शेवटी त्याचं आय.डी. कार्ड पाहिल्यावर उलगडा झाला की त्याचं नाव 'Smart' असंच लिहिलं होत. खरं म्हणजे ते 'स्मार्त' असं असाव पण इंग्रजी स्पेलिंग प्रमाणे उच्चार केल्या मुळे सगळा विनोद घडत होता. तसाच एक 'जानिब' नावाचा ज्युनिअर इंजिनिअर आमच्याकडे जॉईन झाला होता. गप्पा मारायला एकदम मस्त. आम्ही, त्याच्या आडनावामुळे, त्याच्याशी जपूनच बोलायचो. पण एकदा असेच बसलेलो असताना मला त्याच्या गळ्यात जानव दिसलं. मी जवळ जवळ ओरडलोच 'अरे तुझ्या गळ्यात जानव कसं'? त्याला याची सवय असावी. तो हसून म्हणाला 'अरे, म्हणजे काय, मी चक्क देशस्थ ब्राह्मण आहे. माझ्या आडनावा मुळे नेहेमीच अशी फसगत होते. आणि मग समोरच्याचा बघण्या सारखा झालेला चेहेरा पाहून माझी करमणूक होते'.
पारशी मंडळींची आडनावं अशीच मजेदार असतात. असं म्हणतात की त्यांना इराण मधून येताना आडनावं नव्हतीच. पण मग सुरते मध्ये आश्रय मिळाल्यावर त्यांनी आपापल्या व्यवसाया प्रमाणे आडनावे घेऊन टाकली. जसे की पत्रावाला, बूचवाला, मावावाला इ. एक जोक सांगतात की एक जण चुकून पुढे सिलोनला गेला आणि परत आला तो पर्यंत सगळी म्हणजे अगदी  श्रीखंडपुरीवाला, सोडावॉटर बॉटलवाला, सोडावॉटर बॉटल ओपनरवाला पर्यंतची सगळी आडनावं संपली होती. मग त्यानं बिचाऱ्यानं 'सिलोन जाईने पाछाआवावाला' अस आडनाव घेतलं. ही गोष्ट गमतीनं आमच्या पारशी मित्रांनीच सांगितली होती. तेही आमची आपल्याकडल्या  आडनावांवरून चेष्टा करीत असत. 'अरे हा "डावरे" उजव्या हाताने कसा लिहितो?' किंवा 'या "मुंगी"चा साईझ येवढा मोठा कसा' इ. असो.
खरं म्हणजे मलाही काही वेळा प्रश्न पडतात की "अब्जबुद्धे" आणि "सहस्रबुद्धे" यांच्या गप्पा कुठच्या पातळीवर रंगत असतील? किंवा "मुंगुस" आणि "नागराज" गळ्यात गळे घालून कसे? "चिटणीस" हिशोबात खरंच पक्के असतील का? "उपाशी" खरंच जेवत नसतील का? "खरे" आणि "खोटे" नक्की कसे ठरवायचे? "वाघ" आणि "बकरे" आमने सामने येत असतील का? "देवधर" आणि "देव" पकडापकडी खेळत असतील का? "गोडांबे" आणि "कडू" याचं एकमेकांमध्ये पटत असेल का? "तपस्वी" एका पायावर कधी उभे राहत असतील, त्यांच्या अंगावर मुंग्यांचं वारूळ जमत असेल का? एक ना दोन अनेक. "पणशीकर" हे आडनाव मी शक्यतोवर एका दमातच उच्चारतो, "आवळस्करां"पासून लांब रहातो तर "शहाणे" आडनावाच्या माणसापुढे मला न्यूनगंडच येतो. पण काही "चिकटे" तर उदार असल्याचं मी स्वत: अनुभवलं आहे.   
मला सुद्धा लोक विचारतात 'अहो नातू, तुमच्या नातवाला आम्ही काय म्हणायचं'?
तर असा हा 'नाम महिमा'.
इत्यलम.
सुरेश.