Sunday 12 August 2018

काही दंत (वैद्य) कथा

दातांच्या डॉक्टर कडे जाणं म्हणजे कधीच राजीखुषीची गोष्ट नसते. म्हणजे  तो तुमचा दोस्त असला आणि तुम्ही त्याच्या बरोबर चहा पीत हॉटेल मध्ये गप्पा छाटीत बसणार असलात तर गोष्ट वेगळी. पण एरव्ही त्याच्या दवाखान्यात गेल्यावर ती त्याची वरखाली होणारी ऐसपैस खुर्ची, हारीनं मांडून ठेवलेली चकचकीत हत्यारं, डोक्यावरचा भगभगीत दिवा, सापा सारखे पुढे मागे होणारे दिवे, आपल्याकडे दात विचकून बघणाऱ्या कवळ्यांच्या प्रतिकृती आणि किडलेले दात दाखविणारी चित्र पाहून   आपला आधीच दातदुखीनं अर्धा झालेला जीव पूर्ण पणे दडपून जातो. आणि त्याची ती ’हं आता तोंड उघडा’ अशी भारदस्त आवाजातली आज्ञा ऐकल्यावर आपली दातखीळच बसते. काही काही डॉक्टर्स मात्र वातावरण हलकं फुलकं करायचा प्रयत्न करत असतात. आमचे एक डॉक्टर दुसऱ्या वर्गातले होते. त्यांना गाणं गुणगुणायची सवय होती. मी त्यांच्या खुर्चीवर बसलेलो असताना त्यांनी माझ्या ‘आ’ वासलेल्या तोंडाकडे बघून ‘एक बंगला बने न्यारा’ गुणगुणायला सुरुवात केली. मी त्यांना घाबरून म्हटलं ‘डॉक्टर मी तुम्हाला खर्चाचं एस्टीमेट विचारात नाहीये’. त्यांनीच एकदा चला तुमच्या दाताचा एक्स रे काढू म्हणून, मला मान मागे टेकायला सांगून नर्स कडे स्क्रू ड्रायव्हर मागितला. तिने आणलेला गंजका स्क्रू ड्रायव्हर बघून माझी गाळणच उडाली होती. पण या भल्या माणसानं शांतपणे गाणं गुणगुणत त्या स्क्रू ड्रायव्हरनं डोक्यावरचा दिवा घट्ट करायला सुरुवात केली. एकदा त्यांच्या कडे एक नवीन ड्रिल पाहिल्यावर मी त्यांना उत्सुकतेनं त्याचा स्पीड विचारल्यावर त्यांनी अहेतुकपणे, ‘it rotates at ५००० rupees per minute (r.p.m.)’ असं उत्तर दिलेलं मला आठवत!
काही जण मात्र या डॉक्टरांना सवाई भेटतात. ‘आ’ करा म्हटल्यावर एकानं इतका मोठा आ केला की डॉक्टर म्हणाले राहू दे राहू दे, मी तोंडाच्या बाहेर उभा राहूनच दात काढणार आहे, तर दुसरा म्हणाला होता की डॉक्टर आत येऊन दात काढणार असाल तर चपला बाहेरच काढून ठेवा! एका डोअर किपर नं त्यांच्या कुठचा दात काढायचा आहे याला ‘बाल्कनीतला, मागून तिसरा’ असं उत्तर दिलं होतं, तर  एका न्यायमूर्तींनी खुर्चीवर बसताना ‘I will take out THE tooth, only THE tooth, and nothing but THE tooth’ अशी त्यांच्या कडून शपथ घेवविली होती. एक असाच त्रस्त त्यांच्या कडे दुखणारी दाढ घेऊन आला असताना डॉक्टरांनी त्याला आ करायला सांगितलं आणि म्हणाले ‘what a big cavity’ त्यावर तो आधीच वैतागलेला पेशंट चिडून त्यांना म्हणाल ‘डॉक्टर एकदा सांगितलेलं कळलं मला, तीन तीनदा ‘what a big cavity’  असं कशाला सांगता? यावर डॉक्टर हसून म्हणाले ‘अरे मी एकदाच म्हणालो. बाकी इतर प्रतिध्वनी होते! एक जण डॉक्टर जवळ आल्यावर, दात तपासायच्या आधीच इतक्या जोरात ओरडायला लागला की डॉक्टर म्हणाले अरे मी अजून तुला हातही लावला नाही तरी इतका का ओरडतो आहेस? त्यावर तो म्हणाला डॉक्टर दात राहू दे पण आधी माझ्या पायावरचा तुमचा पाय काढा! एकदा दाढ काढून झाल्यावर पेशंटने बिल बघितल्यावर विचारलं डॉक्टर तुम्ही २,००० रु, सांगितले होते मग बिल ६,००० र. कसं? ‘२,००० रु. तुमच्या कामाचे आणि उरलेले ४,००० रु तुमचं ओरडणं ऐकून बाहेरचे दोन पेशंट्स पळून गेले त्यांचें’ डॉक्टरनं शांतपणे उत्तर दिलं!

डॉक्टरांशी हुज्जत घालणारेही काही कमी नसतात. एकानं विचारलं  डॉक्टर दाढ काढायला किती खर्च येईल? डॉक्टरांनी सांगीतलं ५,००० रुपये. तो म्हणाला इतके? अरे बापरे कमी नाही का होणार? त्यावर डॉक्टर म्हणाले माझ्या मदतनिसांशिवाय केलं तर १,००० रु. कमी होतील पण वेळ जास्त लागेल . त्यावर अजून कमी कसे करायचे असे  विचारल्यावर डॉक्टर म्हणाले दाढेत चांदी ऐवजी जरा कमी प्रतीचं मटेरियल वापरलं तर आणखी कमी. असं करता करता शेवटी डॉक्टर म्हणाले ‘भूल न देता केलं तर २,००० रु, पण खूप दुखेल’. यावर तो म्हणतो ठीक आहे मग, माझ्या बायको साठी गुरुवारची अपॉइंटमेंट द्या. डॉक्टर गार!!

दुसरा असाच इरसाल एक जण म्हणाला मी वेदना सहन करीन पण माझं  भूल न देताअर्ध्या पैशात काम करा. डॉक्टर म्हणाले ठीक आहे उद्या बारा वाजता या. त्याप्रमाणे तो आला आणि हुं का चूं  न करता दात काढून घेतला. डॉक्टरांनी आश्चर्यचकित होऊन, पैसे न घेता त्यालाच बक्षीस म्हणून ५०० रु, दिले. संध्याकाळी गप्पा मारताना त्यांनी आपल्या दुसऱ्या डेन्टीस्ट मित्राला ही गोष्ट सांगितल्यावर मित्र म्हणाला ‘तो अमुक अमुक होता का? मग त्यानं आपल्याला सफाई गंडवल! अरे तो माझ्याकडेच दात काढायला आला होता मी त्याला बधिर करणारं इंजेक्शन देऊन बाहेर अर्धा तास बसायला सांगितलं  होतं, पण नंतर बोलावलं तर तो गायबच झाला होता. म्हणजे त्यानं माझ्या कडून भूल घेतली आणि तुझ्या कडून दात काढून घेतला’.

असो, माझी उद्याच दातांसाठी अपॉइंटमेंट आहे, तेंव्हा इथेच थांबतो.