Sunday, 19 April 2015

I rode with the King!



I RODE WITH THE KING

काही वर्षांपूर्वी मी वर्ल्ड बॅंकेच्या एका कामासाठी इजिप्त मध्ये कैरोला गेलो होतो. ‘महत्वाची व्यक्ती’ असं बिरूद मागे असल्याने माझा मुक्काम सेमिरामीस नावाच्या अलिशान हॉटेल मध्ये होता. नाईलच्या किनार्यावरचं हे हॉटेल फारच भव्य होत. विविध देशांमधले राजकीय मुत्सद्दी, नामवंत खेळाडू, फिल्मस्टार्स इत्यादींची तिथे सतत वर्दळ असे. जेम्स बेकर हा अमेरिकेचा परराष्ट्र सचिवही तिथे राहत होता. (काही वर्षांनंतर तिथल्या लॉबीमध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटच घडवून आणला होता, यावरून त्या हॉटेलची ‘महती’ कळावी). असो. माझी खोली तिथे ‘विशेष महत्वाच्या’ १८ व्या मजल्यावर होती. गॅलरीमधून खाली नाईल नदीच विस्तीर्ण पात्र दिसत असे तर स्वच्छ हवामानाच्या दिवशी लांबवर पिरॉमिड्सच दर्शन होई. हॉटेलमध्ये अनेक रेस्टॉरंट्स, कॉफीशॉप्स, केकशॉप्स इ. होती. तिथं नुसता फेरफटका मारणं म्हणजे सुद्धा चांगली करमणूक असायची. माझा मुक्काम आधी ३ आठवडे ठरला होता पण नंतर तो ६ आठवड्या पर्यंत लांबला. कारण इजिप्त मधला कारभार म्हणजे आपल्यापेक्षा दसपट भोंगळ! माझ काम होत इजिप्त मधील सरकारी सार्वजनिक अवजड यांत्रोद्योगांच्या बद्दल एका सल्लागार कंपनीने तयार केलेले रिपोर्ट्स अभ्यासून पुढील कार्यवाही साठी नवीन अहवाल तयार करणे. एकूण १५ उद्योग आणि त्यांच्या वरचे रिपोर्ट्स मला अभ्यासायचे होते आणि त्या कारखान्यांना प्रत्यक्ष भेट देऊन तिथल्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही निष्कर्ष काढायचे होते. हे सर्व रिपोर्टस मला पहिल्याच आठवड्यात मिळणं अपेक्षित होत मगच माझ्या पुढच्या कामाला सुरुवात झाली असती. पण माझा पहिल्या ३आठवड्यांचा नियोजित मुक्काम संपत आला तरी कशाचाच कशाला पत्ता नव्हता.  त्यानंतर कुठे एक एक रिपोर्ट यायला सुरुवात झाली. प्रत्येक रिपोर्ट वाचून त्यावर मला माझा अहवाल बनवून त्या त्या कारखान्यांना भेट द्यायची होती. आता इजिप्तमध्ये भाषेचा प्रश्न. इंग्रजी समजणारे लोक मोजकेच. कैरो मधल्या ऑफिस मध्ये इंग्रजी समजणारा टायपिस्ट नव्हता त्यामुळे माझं हस्तलिखित अॅलेक्झॅन्ड्रीया येथे फॅक्स करून पाठवायचं, ते टाईप झाल्यावर तपासण्यासाठी फॅक्सनेच माझ्याकडे परत, असं सव्यापसव्य चालू होतं आणि ते सुद्धा कैरोतल्या ऑफिस मार्फत. मी भल्या पाहटे उठून, चहाचा एक कप घेऊन, कामाला सुरुवात करायचो, ११च्या  सुमारास ऑफिसचा माणूस माझ्या हॉटेल मधल्या खोलीवर यायचा, आदल्या दिवशीचे रिपोर्ट्स सुधारण्या साठी मला द्यायचा आणि नवीन रिपोर्ट्स टायपिंगला घेऊन जायचा की  माझं नवीन रिपोर्ट्सवरच काम सुरु ते मध्यरात्री पर्यंत! असा सततचा दिनक्रम चालू होता. कसचं अलिशान हॉटेल आणि कसचं काय. जेमतेम ब्रेकफास्ट, चहा आणि दोन वेळा जेवायला बाहेर पडत होतो! नुसता कंटाळा आला होता. असाच एके दिवशी ब्रेकफास्टला बाहेर पडलो तो सबंध पॅसेजमध्ये दर ५०फुटांवर स्टेनगन घेतलेला एक एक पहारेकरी बसलेला. मी दुर्लक्ष करून पुढे निघून गेलो. दुपारी जेवायला बाहेर पडलो तर पुन्हा तोच प्रकार. म्हटलं असेल काही सरावाचा दिवस. संध्याकाळी चहा प्यायला बाहेर पडलो तेंव्हा मात्र न राहवून एका पहारेकर्या जवळ जाऊन आज हा विशेष पहारा कशासाठी असं विचारलं. त्यानं जर संशयानंच माझ्याकडे पाहून माझीच चौकशी चालू केली. मी त्याला मी इथलाच रहिवासी असून माझा खोली नं अमुक अमुक आहे असं सांगितल्यावर त्याचं समाधान झालं. ‘या पॅसेजच्या शेवटी एक स्पेशल खोली आहे. तिथे सध्या स्वीडनच्या राजाचं वास्तव्य आहे. त्यासाठी ही सुरक्षा व्यवस्था आहे’ त्यानं सांगितलं. मी फक्त खांदे उंचावत तिथून निघून गेलो. पण स्वीडनचा राजा म्हटल्याबरोबर माझ्या डोळ्यांसमोर आयर्विंग वॅलेसच्या सुप्रसिद्ध ‘प्राईझ’ या नोबेल प्राईझ वितरण समारंभावर आधारलेल्या कादंबरीमध्ये वर्णन केलेली स्वीडनच्या राजघराण्याच्या वैभवाची, तिथल्या शाही मेजावान्यांच्या थाटांची, तिथल्या परंपरांची दृश्य नाचायला लागली. हा राजा सुद्धा तशाच थाटात, मुगुट वगैरे घातलेला असेल का? असा गमतीदार विचार मनात चमकून गेला. चहा संपेस्तवर माझं तेच विचारचक्र चालू होतं. चहा पिऊन परत आल्यावर त्या मगाचच्या पहारेकर्याला हॅलो म्हणून खोलीत गेलो आणि कामाला लागलो. रात्री 9II च्या सुमाराला जेवायला बाहेर पडलो. लिफ्ट च्या जवळ जाऊन बटन दाबायला लागलो तर एक सुरक्षारक्षक धावत आला आणि म्हणाला थांबा, थोड्या वेळाने राजे साहेब येणार आहेत त्यांना लिफ्टने जायचे आहे. मी आधीच जरा वैतागलेला होतो. मी त्याला म्हटलं ‘ते अजून आलेले नाहीत ना? आणि इथे एकूण चार लिफ्ट्स आहेत’. त्यावर तो काहीतरी म्हणाला आणि मग मी काहीतरी म्हणालो इ. इ. खरं म्हणजे माझ्या शिष्टपणामुळे मी गोत्यातच यायचो पण तेव्हढ्यात ‘बा अदब, बा मुलाहिजा’ अशा घोषणांच्या शिवायच दस्तुरखुद्द राजे साहेब आणि त्यांचे सहकारी तिथे दाखल झाले. पु.लं, च्या अंमलदार मध्ये वर्णन केल्या प्रमाणे राजाच्या अंगावर ड्रेस वगैरे काहीच नाही, म्हणजे, नेहेमीचेच कपडे! असो. आम्हाला बघितल्यावर त्यांनी असख्खलीत इंग्रजी मध्ये ‘काय चालल आहे’ अशी चौकशी केली. त्या बिचार्या सुरक्षारक्षकाची बोबडीच वळली होती. ‘या गृहस्थांना खाली जायचं होत पण मी त्यांना थांबवलं आहे’ अस तो कसबस म्हणाला. त्यावरच त्याचं उत्तर खर औदार्याच होत. ‘हे माझ्या बरोबर येऊ देत की. माझी काहीच हरकत नाही’. माझा खरच कानांवर विश्वास बसत नव्हता. मी मग राजा आणि त्याच्या मंडळा बरोबर त्या लिफ्ट मधून खाली गेलो आणि बाहेर पडताना राजेसाहेबांचे मनापासून आभार मानले. भारतात परत आल्यावर काही दिवसांनी वर्तमानपत्रात बातमी वाचली. स्वीडनचे राजे, ‘किंग गुस्टॉव्ह द सेकण्ड’ भारताच्या दौर्यावर येणार. तेंव्हा माझ्या डोळ्यांसमोरून तो सर्व प्रसंग चित्रपटा प्रमाणे सरकून गेला आणि मी ॐकारला, माझ्या मुलाला, अभिमानानं म्हणालो. ॐकार ‘येस, आय रोड विथ द किंग’!
---सुरेश नातू.

    

Monday, 13 April 2015

माझ्या मराठीचिये बोलू कवतिके

माझ्या मराठीचिये बोलू कवतिके

नोकरीच्या निमित्ताने खूप भटकंती करावी लागली. अर्थातच विविध प्रकारांचे अनुभवही गाठी आले. असंच एकदा एका यंत्राच्या तपासणीसाठी मला नेपाळला जावं लागलं. कामाची साईट लुम्बिनी, गौतम बुद्धांच जन्मस्थान, नेपाळ इथे होती. हे गाव गोरखपूर बॉर्डर जवळच आहे. माझं काम काठमांडूला सुद्धा होत. पण वेळापत्रका प्रमाणे आधी लुम्बिनीला जाण भाग होत म्हणून मुंबई-दिल्ली-काठमांडू-भैरवा असा विमानाचा प्रवास केला. नेपाळ आपल्यापेक्षा किमान ५० वर्ष तरी मागे. त्यामुळे तिथला तो विमानतळ म्हणजे झाडाझुडपांच्या मध्ये उभी एक बिल्डींग, जिथे टॉयलेटची सुद्धा सोय नाही, अस होत. भैरवा ते लुम्बिनी २० एक मैल प्रवास असेल. तिथे मला घ्यायला साईटवरचे काही लोक आले होते. साईटवर जाता जाता त्यांनी मला ‘शुभवर्तमान’ दिल की मी ज्या यंत्राच्या तपासणीसाठी आलो होतो ते यंत्र चालाविण्यासाठीच डिझेल इंजिन (प्राइम मूव्हर) बिघडलं आहे आणि त्याचे पार्टस् आणण्यासाठी साईट इंजिनिअर दिल्लीला गेला आहे, चार दिवस काहीही काम होणार नाही. मी हतबुद्ध! पण काय करणार? म्हटलं ठीक आहे. आत्ता साईटवर जाऊ. पण त्याआधी उद्याचं काठमांडूच  तिकीट काढू म्हणजे मी तिथलं काम तरी उरकून घेईन. त्यांनी सांगितलं की काळजी करू नका. तिकीट संध्याकाळ पर्यंत तुमच्या हातात पडेल. साईटवर अर्थातच सुनसान होत. मी तपासण्या साठी आलेल यंत्र म्हणजे एक जवळ जवळ ४० फूट उंच मनोऱ्या सारख होत. मावळत्या संधीप्रकाशात ते जरा भितीदायाकच दिसत होत. तिथल्या ऑफिस मध्ये जाऊन त्या यंत्राची जुजबी माहिती गोळा केली आणि आता मुक्कामी हॉटेलवर जाऊ अस म्हटलं. ती मंडळी म्हणाली सध्या साईट बंद असल्यामुळे आमचे कुटुंबीय इथे राहायला आले आहेत म्हणून आम्ही तुमची सोय गेस्ट हाउस मध्ये केली आहे. जेवण वगैरे आटपल्यावर मग तुम्हाला तिकडे सोडू. जेवण गप्पा मारत जरा आरामातच उरकलं. मला वाटलं होत की गेस्ट हाउस तिथेच असेल पण ते म्हणाले की नाही ते थोडं लांब आहे तुम्हाला जीप ड्रायव्हर सोडेल. मी निघालो. अष्टमीची रात्र असावी. थोडा मंद चंद्र प्रकाश पसरला होता. आता या लोकांच्या क्वार्टर्स एकीकडे, गेस्ट हाउस दुसरीकडे, आणि साईट मध्यभागी. लुम्बिनी छोट गांव असल्यानं सगळ निर्मनुष्य! एक मळलेला रस्ता, आजूबाजूला वाढलेलं जंगल, लांबवर लुकलुकणारा एखादा दिवा असा आमचा प्रवास चालू झाला. ड्रायव्हरशी थोड्या गप्पा मारायचा प्रयत्न केला. तो म्हणाला इथे बुद्धाचा जन्म झाला म्हणून बरेच लोक इथे भेट देतात बाकी इथे काही नाही. इथले  सर्व लोक दूर दूर राहतात. जाता जाता परत साईट वरच्या त्या यंत्राच दर्शन झालं. एकुलता एक उभा राहिलेला तो मनोरा आता भेसुरच दिसत होता. थोडं पुढे गेल्यावर एका कुंपणात बरेचसे चौथरे आणि त्याच्या शेजारी प्रचंड बुद्ध विहार दिसला. हे बुद्धाच जन्मस्थान आणि यशोधरेचा महाल. ड्रायव्हरन माहिती पुरवली. त्यावेळी ते दृष्य अर्थातच फार काही आनंददायक नव्हत! अर्ध्या एक तासाच्या प्रवास नंतर आम्ही एकदाचे त्या गेस्टहाउसवर पोहोचलो. ते एकूण सर्व वातावरणाला साजेसंच होत. मध्ये एक छोटी झोपडी सारखी इमारत आणि बाजूला, सेल्युलर जेल असावा, तसे सूर्य किरणां सारखे पसरलेले, खोल्यांचे विभाग. तिथे स्वत:ला मँनेजर म्हणवणारा एक जण उभा होता. ‘तुमचीच वाट पाहत होतो’ तो म्हणाला. ड्रायव्हरने माझी बँग आणून दिली आणि उद्या सकाळी घ्यायला येतो असं सांगून निघून गेला. रजिस्टर मध्ये माहिती भरता भरता मी त्या मँनेजरशी उगाचच फुटकळ गप्पा मारत होतो. त्याला म्हटलं गावाच्या मानाने तुझं हॉटेल खुपच मोठ दिसतंय. तो खुष! किती खोल्या आहेत विचारल्यावर तो म्हणाला ‘३५ खोल्या आहेत’. इतकी माणस इथे येतात? असा प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला ‘हो. बुद्धाच्या जन्म ठिकाणाला भेट द्यायला जपान, थायलंड, कोरिया, वगैरे देशातून बरेच लोक येतात’. अरे वा, आज किती लोक आहेत विचारल्यावर तो म्हणाला, ‘नाही आज तुम्हीच फक्त’. मी जरा चिंतेतच पडलो. त्याला विचारलं तू इथेच राहतोस ना? त्यावर तो म्हणाला ‘नाही नाही मी तुमचीच वाट बघत थांबलो होतो. आता मी माझ्या घरी गावात जाणार’. मी गार! त्या जंगलात ३५ खोल्यांच्या हॉटेल मध्ये रात्रभर एकट्याने राहायची कल्पना फार सुखावह नव्हती. पण सांगतो कोणाला? समान घेऊन खोली गाठली. खोली कसली? एक कॉट, टेबल, खुर्ची, कॉयर मॅटिंग, मिणमिणता पिवळा दिवा बस्स. दरवाजा सुद्धा आपल्या कडच्या जुन्या वाड्यातल्या सारखा, फळकुटांचा. एकुलत्या एका खिडकीचा तोच अवतार. मनाचा हिय्या करून दार बंद केलं, टेबल ओढून दाराला लावलं खिडकी आतून घट्ट लावली आणि कपडे न बदलता त्या कडक गादीवर आडवा झालो. रात्री नाट्यमय अस काहीही घडल नाही – नाहीतर हे लिहायला मी शिल्लकच नसतो – सकाळी रीतसर उठलो तो पर्यंत तो मँनेजरसुद्धा आला होता. चहा, ब्रेकफास्ट घेऊन जीप मधून परत साईटवर आलो. काठमांडूची फ्लाईट दुपारी दोनची होती म्हणून तिथे थोडा वेळ काढून जेवण उरकून जीपने भैरवाला आलो. चेक इन करायला गेलो तर पुन्हा एक धक्का! ‘आज नेहेमीचं विमान न येता छोट विमान येणार आहे. नंबराप्रमाणे पहिले थोडेच प्रवासी जाऊ शकतात. सबब, ‘तुमच तिकीट कन्फर्मड असल तरी तुम्हाला जागा नाही’. ‘बसा आता शंख करत’ मी मनात म्हटलं. पर्याय? रात्रभर प्रवास करून बसने जाणे! पुन्हा तडफडत गावात येऊन रात्री ९ च काठमांडूच्या बसच तिकीट काढल. बस म्हणजे काय ट्रकची डागडुजी करून सीट्स वगैरे बसवलेल्या! प्रवास सतत दुर्गम डोंगरांमधून. कित्येक बसेस मधेच गायब होण्याची ख्याती. नशिबावरच हवाला ठेवायचा. असो. दुपारचे चारच वाजले होते. बराच वेळ हातात होता म्हणून मग गावात फेरफटका मारला त्यावेळी आपल्याकडे मिळत नसलेल्या बर्याच जपानी वस्तू बाजारात होत्या. त्यांची थोडी फार खरेदी वगैरे केली. संद्याकाळ झाल्यावर एका हॉटेलात पोट पूजा करून बस स्टॅन्डवर पोहोचलो. तिथे पाहतो तर तोबा गर्दी उसळलेली. पशुपतीची कुठची तरी यात्रा असल्याने बरीचशी साधू मंडळी त्यांचे कमंडलू त्रिशूल वगैरे घेऊन सज्ज झालेली. चपट्या नाकांची, जुने पुराणे जाडजूड (सैन्यातले टाकून दिलेले असावेत) लोकरीचे  कोट घातलेली मंडळी सामानाचे ढीगच्या ढीग घेऊन अगम्य भाषेत कलकलाट करत घुसाघुशी करत होती. थोडाफार पांढरपेशा दिसणारा मीच एकटा. रिझर्वेशन असल्यान माझी पुढची सीट आणि शेजारची सीट सुद्धा मोकळीच होती. मी जरा धास्तावालेलाच होतो. एव्हढा रात्रभराचा प्रवास कसा व्हायचा? आणि शेजारी कोण येणार? इथे गुंडगिरी वगैरे असेल का? पण मनाचा हिय्या करून एकदाचा बस मध्ये चढून सीटवर बसलो. ड्रायव्हरने बस सुरु केल्याकेल्या एक तरणाबांड, गोटीबंद शरीराचा, गोरापान नेपाळी मुलगा उडी मारून माझ्या शेजारी येऊन बसला. मला त्यातल्या त्यात दिलासा! एव्हढ्या थंडीतही त्याने छाती उघडी टाकलेलं जाकीट आणि जीन इतकाच पोशाख केला होता. बस चालू झाल्यावर आतमधला कोलाहल जरा कमी झाला. थोडं स्थिरस्थावर झालं. मी मग हळू हळू त्या मुलाशी संभाषण साधायचा प्रयत्न केला. त्याला इंग्रजी किंवा हिंदी काहीच येत नव्हत. कसनुस हसून तो माझ्या बोलण्याला साथ द्यायचा प्रयत्न करत होता. मला एव्हढंच कळल कि त्याला नेपाळ सरकारची स्कॉलरशिप मिळाली असून तो पुढे चीनला जाण्यासाठी काठमांडूला चालला आहे. मोडक्या तोडक्या हिंदीतून मी त्याला विचारलं ‘आलास कुठून’? ‘मुंबईहून’ तो म्हणाला. ‘पण तुला तर इंग्रजी हिंदी येत नाही मग मुंबईत तू काय करतोस? त्याच उत्तर ‘मला मराठी येत ना’. त्या हजरो फुट उंचीवर मी आणखी अजून काही हजार फुट उडालो. माझी प्रिय मातृभाषा कुठे पर्यंत पोहोचली आहे ते पाहून मी पूर्णपणे सर्द झालो. मग काय गप्पाच गप्पा सुरु झाल्या. त्याच मुंबईत मार्शल आर्ट स्कूल होत. कसली स्कॉलरशिप आहे विचारल्यावर तो म्हणाला ‘किक बॉक्सिंगची’. म्हटलं चला आता सुरक्षेची काळजी नाही. ‘तू आता तीन महिने नाहीस मग तुझ्या स्कूलच काय’? विचारल्यावर म्हणाला ‘ माझा चेला आहे ना’. पुन्हा मी गार. चेला हा शब्द मी सुद्धा वापरला नसता. काठमांडूला उतरल्यावर  त्याला चहा प्यायला चल म्हणून आग्रह केला तर ‘माझ भाग्य म्हणून तुमच्याशी ओळख झाली’ म्हणून झपझप चालत निघून सुद्धा गेला. मी त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे कितीतरी वेळ बघतच राहिलो.  

----सुरेश नातू,   

Sunday, 7 October 2012

मित्रांनो,

अमेरिकेत रिकामपणी एक लेख लिहिला आहे. आवडला तर बघा. मला जरूर सांगा.

ड्रायव्हिंग इन अमेरिका

अमेरिकेमध्ये पाहूणा म्हणून आल्यावर इथे गाडी चालवणं म्हणजे धाडसाचंच काम असं वाटायला लागतं. त्याचं मुख्य कारण म्हणजे गाडीत ड्रायव्हर डाव्या बाजुला आणि गाडी चालवायची रस्त्याच्या उजव्या बाजूने. आपल्या अगदी उलट. प्रचंड घोटाळा उडतो. कित्येक वेळा ड्रायव्हरच्या शेजारी म्हणून आपण डाव्या बाजूने दार उघडायला जातो आणि आपला मोरु बनतो. अर्थात हे सुरुवाती सुरूवातीलाच. पण एकादा का त्याची संवय झाली की मग आपण रुळतो. आणि इंटरनॅशनल लायसेन्सच्या जोरावर गाडी चालवायला लागलो की हळूहळू त्यातल्या खुब्यांची आणखी माहिती व्हायला लागते. रस्त्यावर सतत सूचनांच्या, डायरेक्शन्सच्या पाट्या असतात त्यांच्याकडे चतुरस्त्रपणे लक्ष ठेवायला लागतं. आखून दिलेल्या लेन्सचं, ट्रॅफीक लाईट्सचं भान ठेवायला लागतं. क्रॉसिंगवर, डावीकडे वळताना लगेच न वळता रस्त्याच्या पलीकडून वळायचं, आणि उजवीकडे वळताना लगेचच वळायचं, हे प्रयत्नपूर्वक लक्षात ठेवायला लागतं. पुढची गाडी आणि आपली गाडी यातलं सुरक्षित अंतर ठेवायची काळजी घ्यायला लागते. मग इथे ड्रायव्हिंगची मजा वाटायला लागते. अर्थात काही काही घोटाळे होतातच. आपण सिग्नल दाखवायला जातो आणि शिंचे वायपरच चालू होतात! कारण स्टीअरिंग व्हील उजवीकडून डावीकडे नेताना सिग्नल आणि वायपरच्या लिव्हर्स मात्र उलट्या बाजूला केलेल्या असतात. आपल्याला सतत हात बाहेर काढून सिग्नल द्यायची संवय, पण इथे मात्र तसं केलं तर बाकिच्यांचा गोंधळच. आपण ड्रायव्हिंग करताना दुसर्‍या ड्रायव्हर्स कडे क्रुद्ध नजरेनं पाहत असतो तर इथे मात्र, 'पहिले आप पहिले आप'! पादचार्‌यांच्या बाबतीत तर सौजन्याची कमाल. आंखून दिलेल्या पट्ट्यांमधून तुम्ही क्रॉस करणार असल्याचा संशय जरी आला तरी गाडी ठप्प. तुम्ही गेल्यावरच ती पुढे. मुलांच्या बाबतीत तर सर्वोच्च काळजी. मुले चढण्या उतरण्या साठी स्कूल बस थांबलेली असताना तिला ओलांडून पुढे जाणं म्हणजे महत्पाप! रस्त्याच्या पलीकडे सुद्धा वहनांनी थांबलच पाहीजे. गंमतच आहे. एरव्ही मुलांच्या मानसिकतेची पर्वा (सामाजिक रुढींच्या दृष्टीनं) न करणारी ही मंडळी या बाबतीत मात्र अति दक्ष! काहीकारणाने जर बसला उशीर होणार असेल तर ट्रॅफिक डिपार्ट्मेंट कडून तसा घरी फोन येतो.

रस्ते हे अमेरिकेचं वैशिष्ठ्य आहे. किंबहुना त्यांचा मानबिंदूच आहे तो. त्यांची प्रगती होण्याला रस्त्यांचं जाळंच कारणीभूत आहे. आपल्याला एखाद्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे चं अप्रूप वाटतं. पण इथे सर्वत्र त्याचंच दर्शन! मैलोन् मैल वहाणारे. एकेका बाजूला सहा सहा लेन्स असलेले. समोरच्या चढावर डौलदार वळण घेणारा तो रूबाबदार रस्ता नुसता पहाणं म्हणजे नेत्रसूखच. एकदा मुख्य रस्त्यावर आलं की वेग मर्यादा 50 ते 60 मैलांच्या पुढेच. सुरूवातीला छातीत धडकीच भरते. पण सर्वच वहातूक अत्यंत शिस्तीत असल्याने कुठेच प्रॉब्लेम येत नाही. मात्र वहानांची संख्या प्रचंड असल्याने ठरावीक ठिकाणी ट्रॅफीक जॅम्सना सामोरं जावं लागतं. तरीही लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून, मुख्यत: सकाळच्या वेळी, टी.व्ही. वरून कुठच्या रस्त्यावर गर्दी आहे आणि कुठचा मोकळा आहे याची सतत माहिती दिली जात असते. रस्त्यावरील वहानांची संख्या कमी असावी म्हणून अनेक प्रयोग केले जातात. शक्य असेल तिथे लोकांनी 'कार पूल' करावा म्हणून प्रोत्साहन दिलं जातं. ज्या वहाना मध्ये तीन पेक्षा जास्त प्रवासी असतील त्यांना स्पेशल लेन असते. अर्थात इथल्या लोकांच्या मानसिकते मुळे ही स्पेशल लेन जवळपास रिकामीच असते आणि शेजारच्या लेन्स मध्ये मागेपर्यंत रांगा लागलेल्या असतात.
सगळ्या हायवेज वर पुढचा बाहेर पडणारा रस्ता (एक्झिट) किती अंतरावर आहे याच्या स्पष्ट सूचना दिलेल्याअसतात. सर्व्हीस एरिया, म्हणजे 'विश्रांतीची जागा' ठिकठिकाणी असते. पुढची जागा आता यानंतर किती मैलांवर आहे हे ही सांगीतलेलं असतं. त्यामुळे कितीही लांबचा प्रवास असला तरी सुखावह! हो, इथे आगगाडी मधून किंवा विमानातुन जाणं तसं परवडण्या सारखं नसल्यामुळे आम जनता लांब जायचं असलं तरी रस्त्यानंच जाणं पसंत करते. त्यातून आता बरोबर जी. पी. एस. असल्याने रस्ता चुकायाचा वगैरे प्रश्नच नाही. गाड्यां मधल्या सुखसोयी अत्याधुनिक असल्यानं ड्रायव्हिंगचं टेन्शन नाही. गाडीत चुकून किल्ली ठेऊन खाली उतरायला लागलो की गाडीचा आरडा ओरडा सुरू. गाडी रिव्हर्स करताना मागे कोणी आलं तर गाडी थांबलीच. इंटलिजंट गाडी म्हणे! अर्थात हल्ली आपल्या कडेही अशा गाड्या दिसतात. एक गंमत म्हणजे काही वर्षां पूर्वी, भावाकडे फ्ल्युईड ड्राईव्ह्ची नवी कोरी टोयोटा गाडी पाहील्यावर, 'म्हणजे ही तर आपल्या कडच्या ल्युना सारखीच, गीअर वगैरे बदलायची भानगड नाही' असं मी म्हटल्यावर माझ्या वहीनीनं माझ्यावर जी जळजळीत नजर टाकली होती ती अजून विसरलो नाही. असो. तर रस्ते आणि त्यावरचा प्रवास ही अमेरिकन लोकांची जीवन पद्धतीच आहे. ज्या कंपन्यांमध्ये मार्केटिंगच्या लोकांना सतत प्रवासाची गरज असते त्यांना वेळोवेळी ड्रायव्हिंगचे रिफ्रेशर्स कोर्सेस असतात. दुसर्यानं कितीही चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवली तरी तुम्ही संयम सोडू नका, हे त्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी.

हे सर्व सुरक्षीत रहाण्यासाठी रहदारीचे नियम अतिशय कडक आहेत. ट्रॅफिक लाईट्स्चा मान प्रत्येकाने राखलाच पाहीजे. जर एखाद्याने लाल लाईटवर क्रॉस केलंच तर समोरच्या खांबावरील कॅमेर्‌या मध्ये त्याचा फोटो आणि लगेच नोटीस. त्यातल्या दंडा शिवाय भीतीदायक म्हणजे लायसेन्सवर शेरा. आणि त्याचा परिणाम म्हणजे इंन्शुअरन्सच्या हप्त्यामध्ये वाढ. जास्तवेळा शेरे मिळाले तर लायसेन्स रद्द. नकोरे बाबा ती भानगड! ट्रॅफिक लाईट्स् शिवाय, जिथे दोन रस्त्यांचं क्रॉसिंग असेल तिथे कमी रहदारीच्या रस्त्याच्या कोपर-यावर स्टॉप
साईन. रात्रीचे बारा वाजले असतील, सगळीकडे शुकशुकाट असला तरी तिथे गाडी पूर्णपणे थांबवून दुसर्‍या बाजूने कुठलही वहान येत नाही याची खतरजमा केल्यावरच पुढे जायचं. हे न करणं म्हणजे साक्षात मृत्युला आमंत्रण. कारण ज्याला स्टॉप साईन नाही तो बिनदिक्कत पूर्ण वेगात येणार. ज्या क्रॉसिंगला दोन्ही रस्त्यांवर सारखी रहदारी असेल तिथे चारी कोपर्‌यांवर स्टॉप साईन. सर्वांनी पूर्ण थांबून आळीपाळीनं जायचं. हे अगदी अमेरिकाभर छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा. त्यामुळे कुणाच्याच मनात गोंधळ नाही. हे सर्व अंगी बाळ्गून एखादेवेळी अपघात झालाच तर वॅं वॅं करत पोलीसांच्या गाड्या आणि अॅंब्युलन्सेस लगेच हजर. त्यांच्या हालचालींना अडथळा नको म्हणून अगदी हायवे वर सुद्धा सदैव मोकळ्या सर्व्हीस लेन्स! खरंच अभिमान वाटवा अशी शिस्त आणि व्यवस्था.

गाडी चालवायला एकूण मजा येते. आणि एखादी रपेट मारून आल्यावर शेजारी जीव मुठीत पकडून बसलेली बायको जेंव्हा कौतुकाचा कटाक्ष टाकते त्या क्षणी तरी मी 'जगी सर्व सुखी'!

सुरेश नातू.